इत्यर्थ: सुरुवात ते सद्य

इत्यर्थ एक स्वप्न आहे..
मराठी भाषेच्या या नव्या डिजिटल रुपाला पडलेलं एक अनोखं स्वप्न.

सातासमुद्रापार कामानिमित्त गेलेली, मायभूमीपासून दूर दूर अडकून पडलेली लेकरं एकत्र यावीत. इस्रायल, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, सिंगापूर अशी पसरलेली भावंड एकमेकांच्या जवळ यावीत आणि एक अंगण तयार व्हावं. एक अक्षर अंगण सजावं आणि त्यात आपल्यातल्या प्रत्येकच मायमराठीच्या लेकराला मुक्तपणे विहरता यावं असं एक मुक्तपीठ म्हणजे इत्यर्थ.

इत्यर्थची सुरुवात जून २०१२ मध्ये एक प्रायोगिक उपक्रम म्हणून झाली. ई-साहित्य प्रतिष्ठानची कित्येक ई-पुस्तकं, नियतकालिकं काव्यावर निघाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कित्येक दर्जेदार कवींना आपण इंटरनॅशनल बनवलं. सातासमुद्रापार पोहोचवलं. मराठी ई-पद्य लेखनात आज ई-साहित्य प्रतिष्ठानचं एक अढळ स्थान आहे ते त्यामुळेच. पण २०१२ च्या सुरुवातीलाच आम्ही ठरवलं की या वर्षी गद्य हाती घ्यायचं. आणि त्याच्याशीच एकनिष्ठ राहायचं. ज्या निष्ठेने आम्ही कवितांची पुस्तकं काढली त्याच निष्ठेने कथा-लेख-ललित-कादंबऱ्यांचीही सेवा करायची. आणि त्यातूनच आम्हाला गरज भासली ती आपल्या हक्काच्या गद्यव्यासपीठाची. आणि इत्यर्थचा जन्म झाला.

सद्यतः तीन संपादकांचं एक मंडळ इत्यर्थची जिम्मेदारी उचलतं.
बिलासपूर (छत्तीसगढ) येथून तनवीर सिद्दीकी.
ठाणे येथून नाम गुम जायेगा.
आणि औरंगाबाद येथून सृजा.
ही ती तीन माणसं.

मराठी गद्य उत्तम लिहिणारा एखादा हिरा सापडला की लगेचच त्याला कोंदण देणं आणि इत्यर्थ परिवारात सामिल करणं हे त्यांचं काम. याशिवाय अनेक मदतीचे हातही असतात. मांडणी-सजावट, तांत्रिक बाजू, मुखपृष्ठ आणि अंतर्गत डिझाईन अशा अनेक बाबींसाठी पूर्ण ई-साहित्य प्रतिष्ठान झटतं. तसंच वाचकांमधूनही अनेक मदतीचे हात पुढे येतात.

इत्यर्थ बाबतीत कुठलीही विचारणा किंवा सूचना करायची असल्यास आम्ही सर्वच जण etyarth.esahity@gmail.com या पत्त्यावर आपल्या ई-पत्रांची वाट पहात आहोत.

No comments:

Post a Comment